साखर अनुदानावर ऑस्ट्रेलियाची अखेर माघार; भारताबरोबर ‘गोडवा’ ठेवणार कायम

664

सिडनी चीनी मंडी

भारतात साखर निर्यातीला देण्यात येत असलेल्या प्रोत्साहनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरत असल्याचे सांगून ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध दंड थोपटले होते. जागतिक व्यापार संघटनेत भारताच्या अनुदान धोरणाविरुद्ध ऑस्ट्रेलियाने तक्रार दाखल केली होती. पण, हा मुद्दा आता फारसा उचलून धरणार नसल्याचे सांगून ऑस्ट्रेलियाने नरमाईची भूमिका घेतली आहे. भारतासोबतचे व्यापार संबंध आणखी दृढ करण्याचा मनोदयही त्यांच्या व्यापार मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री सायमन बर्मिंगहम म्हणाले, जागतिक व्यापार संघटनेमध्ये दोन मित्र देशांमध्येच वाद होतात. कॅनडासोबत आमचा वाईन या विषयांवरून वाद झाला होता. पण, त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडले नाहीत तर, ते चांगलेच राहिले. जागतिक व्यापार संघटनेत भारतासोबत साखरेवरून सुरू असणारे आमचे मतभेद मिटण्याची शक्यता आहे. या संदर्भात भारताचे वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी अनेकदा चर्चा झाल्याची माहिती बर्मिंगहम यांनी सिडनीमध्ये झालेल्या वाणिज्य परिषदेत दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियन शुगर मिल कौन्सिलने (एएसएमसी) भारत सरकारविरोधात जागतिक व्यापार संघटनेत दिलेली तक्रार मागे घेण्याची तयारी सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारताच्या अनुदान धोरणामुळे ऑस्ट्रेलियातील साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले असले तरी, भारतासोबतचे व्यापार संबंध कायम राहणार असल्याचे ऑस्ट्रेलियाकडून सांगितले जात आहे.

भारताने निर्यातीला प्रोत्साहन दिल्यामुळे जागतिक बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर साखर उपलब्ध होईल आणि दरही कोसळतील, अशी भीती ऑस्ट्रेलिया आणि जागतिक बाजारपेठेला आहे. याबाबत एएसएमसीचे संचालक डेव्हिड रेनी म्हणाले, ब्राझीलला मागे टाकून जगातील सर्वांत मोठा साखर निर्यातदार होण्याचा प्रयत्न असल्याचे भारतीय मंत्री सांगत आहेत. पण, त्यांच्या या धोरणामुळे ऑस्ट्रेलियातील काही साखर कारखान्यांना टाळे लावण्याची वेळ येणार आहे.

दरम्यान, जागतिक बाजारात दर घसरल्यामुळे भारतातील साखर कारखान्यांनाही साखरेची निर्यात करणे कठीण झाल्याचे भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मुळात चीनच्या वर्चस्ववादी धोरणांमुळे जपान सारख्या देशाला भारताशी संरक्षण आणि व्यापार संबंध दृढ करावेसे वाटत आहेत. त्यावेळी ऑस्ट्रेलियालाही दक्षिण आशिया आणि भारताशी चांगले संबंध ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया कौन्सिलचे शेबा नंदकेओल्यार म्हणाले, भारतासोबतचे आमचे संबंध खूप महत्त्वाचे आहेत. व्यवसाय, व्यापार क्षेत्रात तर ते आणखी जास्त प्रभावी आहेत.

ऑस्ट्रेलियातून २०१६मध्ये भारताला १४.६३ बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरची निर्यात झाली होती. ऑस्ट्रेलियातून सर्वाधिक निर्यात होणाऱ्या देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. यासंदर्भात ऑस्ट्रेलियाची व्यापार राज्यमंत्री जेसन क्लॅरे म्हणाले, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील व्यापार संबंध अपेक्षेप्रमाणे वाढलेले नाहीत. आपल्याला त्यासाठी काम करावे लागेल.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here