आजरा कारखान्याच्या संचालकांनी पारदर्शक कारभार करावा : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर : आजरा सहकारी साखर कारखान्याची माजी आमदार स्व. वसंतराव देसाई यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत उभारणी केली होती. कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटत असतानाच विरोधकांनी ही निवडणूक लादली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पेटून उठलेल्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करीत यश मिळवले. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने पंचवार्षिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. नूतन संचालकांनी पारदर्शी कारभारातून सभासदांचा विश्वास जपावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आजरा कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाचा कागल येथे सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दिगंबर देसाई होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने म्हणाले की, पालकमंत्री मुश्रीफ हेच सहकार चळवळ यशस्वी करू शकतात, यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास दृढ झाला आहे. जिल्हा बँक, बाजार समिती, बिद्री आणि आता आजरा साखर कारखान्यातील हे यश त्याचेच द्योतक आहे. केडीसीसीचे संचालक सुधीर देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे यांची भाषणे झाली. दिगंबर देसाई, मारुतीराव घोरपडे, दीपक देसाई, मुकुंद देसाई, सुभाषराव देसाई, शिवाजीराव नांदवडेकर, उदयसिंह पोवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here