बेळगाव शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी

बेळगाव : शेडबाळमध्ये (ता. कागवाड ) ४ फेब्रुवारी रोजी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अंगावर पडून चार महिलांचा मृत्यू झाला होता. यामुळे ट्रॅक्टर व ट्रकमध्ये प्रमाणाबाहेर भरल्या जाणाऱ्या उसाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर आता खानापूर रोडवरून महामार्गाकडे जाणारी व तिकडून इकडे येणाऱ्या ऊसवाहू ट्रॅक्टर व ट्रकना शहरातून जाण्यावर पोलिस खात्याने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून ऊसवाहू वाहने कॅम्पमधून शहराबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.

पर्यायी रस्ता वा रिंगरोड नसल्याने शहरातूनही धोकादायक अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. ही वाहने शहराच्या मध्यवर्ती भागातूनच ये-जा करतात. ऊस वाहतूक करणारी वाहनेही शहरातून ये-जा करत होती. काकतीतील मार्कंडेय तसेच अन्य साखर कारखान्यांकडे जाणारे व तिकडून खानापूरच्या लैला शुगर्ससह अन्य कारखान्यांकडे जाणारी वाहने मुख्य रस्त्यावरुन ये-जा करत होती. परंतु, शेडबाळ घटनेनंतर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी वाहतूक पोलिस विभागाला ऊस वाहतूक करणारी वाहने शहराबाहेरुन सोडण्याच्या सक्त सूचना दिल्या. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून ऊसवाहू वाहने शहरातून जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शेडबाळ येथील घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिस व आरटीओ खात्याल लक्ष्य केले. परंतु, दोन्ही खात्यांनी जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. आता पोलिस खाते या घटनेनंतर सजग झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here