बेनापोल बंदरात गेल्या २८ दिवसांपासून भारतातून सुमारे १२५० टन साखर घेवून जाणारे ४२ ट्रक रखडले आहेत. सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर स्थानिक सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी लागू केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. सेतू एंटरप्रायझेसने २५ डिसेंबर रोजी बेनापोल येथे २५०० टन साखरेचे एकूण ८४ ट्रक आणल्याचे बंदरातील सूत्रांनी सांगितले. यापैकी नॅशनल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने ठरवलेल्या दरानुसार प्रत्येक टन साखरेसाठी $४३० घेवून निम्मे ट्रक सोडल्याचे सेतू एंटरप्रायझेसचे क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एजंट अब्दुल लतीफ यांनी सांगितले. मात्र, बांगलादेश शुगर रिफायनरी असोसिएशनने केलेल्या तक्रारीनंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी उर्वरित १,२५० टन साखरेसाठी प्रती टन $५७० असा उच्च दर लागू केला आहे.
द डेली स्टारने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, बांगलादेश शुगर रिफायनरी असोसिएशनने वास्तविक किंमतीपेक्षा कमी मूल्य दाखवून बंदरातून साखर सोडली जात असल्याची तक्रार केली हती. मात्र, सीमाशुल्क अधिकारी सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम घेवू शकत नाहीत असे लतिफ यांनी सांगितले. सध्या साखरेने भरलेले ४२ ट्रक बंदराच्या ट्रक टर्मिनलच्या ट्रान्स शिपमेंट यार्डमध्ये अडकले आहेत. आयातदार जास्त दर देऊन माल नेण्यास तयार नाहीत असे त्यांनी सांगितले. यातून आयातदारांचे मोठे नुकसान होईल, असेही त्यांनी सांगितले. बंदरात अडकलेल्या या ट्रक्सच्या पार्किंगसाठी दररोज २,००० रुपये मोजावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनांनंतर या प्रकरणात पुढील कार्यवाही होईल असे बेनापोल कस्टम हाऊसचे सह आयुक्त मोहम्मद शफायेत हुसेन यांनी स्पष्ट केले आहे.