ढाका : बांगलादेशमध्ये साखर कारखान्यांच्या आधुनिकीकरणाबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. गेल्या दोन वर्षात नवी मशीनरी, तंत्रज्ञान वापराबाबत कोणतीही प्रगती झालेली दिसून येत नाही. बांगलादेश साखर आणि अन्न उद्योग निगम (बीएसएफआयसी) आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना बंद साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत खूप कमी माहिती आहे. सरकारने २०१९ मध्ये आधुनिकीकरणाची घोषणा केली होती.
बीएसएफआयसीने डिसेंबर २०२२ मध्ये राज्याच्या मालकीच्या १५ कारखान्यांपैकी सहा कारखाने अनिश्चित काळासाठी बंद केले आहेत. बंद कारखान्यांमध्ये पबना साखर कारखाना, श्यामपूर साखर कारखाना, पंचगढ साखर कारखाना, सेताबगंज साखर कारखाना, रंगपूर साखर कारखाना आणि कुश्तिया साखर कारखान्याचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २०२१ पर्यंतच्या गेल्या पाच वर्षात बीएसएफआयसीला ४० अब्ज रुपयांचा तोटा झाला आहे. बांगलादेशातील वार्षिक देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यााठी १.८ मिलियन टन साखरेची गरज आहे. मात्र, देशांतर्गत कारखान्यांचे उत्पादन ८०,००० टनावर आले आहे. एक दशकापूर्वी साखर उत्पादन २ मिलियनपर्यंत होते. मात्र, उत्पादन खर्च अधिक असल्याने तसेच उत्पादन तंत्रज्ञान खराब असल्याने बीएसएफआयसीच्या बॅलन्स शीटवर याचा नकारात्मक परिणाम झाला आहे.