ढाका : राजधानीतील बाजारपेठेसह अनेक ठिकाणी पॅकबंद साखर आता जवळपास गायब झाल्याची स्थिती आहे. तर नॉन-पॅकेज्ड (खुली विक्री होणारी) साखरेचाही तुटवडा आहे. त्यामुळे दरात आणखी वाढ झाली आहे. कारवान बाजार, मोगबाजार आणि राजधानीच्या इतर भागांमध्ये शुक्रवारी साखरेची १३०-१४० टका प्रती किलो दराने विक्री झाली. सरकारने ठरवून दिलेल्या १२०-१२५ टका प्रती किलो दरापेक्षा ही किंमत १०-१५ टका जास्त आहे.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला वाणिज्य मंत्रालयाने रिफायनर्सना आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीनंतर साखरेच्या किरकोळ विक्री दरात १६ टका वाढ करण्याची परवानगी दिली आहे. तर ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेशकडील आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात साखरेच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. गेल्यावर्षी साखर ८० ते ८४ टका प्रती किलो दराने विकली जात होती, असे बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या १५ ते २० दिवसांपासून पॅकेज्ड साखरेचा पुरवठा केला गेलेला नाही. काही अटींवर नॉन-पॅकेज्ड साखर मिळते आणि त्याचा दर अधिक असतो असे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. याबाबत कारवान बाजारामधील हाजी मिनाझ एंटरप्रायजेसचे मोहम्मद कबीर म्हणले की, “साखर पुरवठादारांच्या एजंटांनी गेल्या २० दिवसांपासून ऑर्डर घेतलेली नाही. साखरेची ऑर्डर देताना काहीवेळा पीठ, चहाची पाने किंवा इतर वस्तू घ्याव्या लागतात. घाऊक दुकानात साखरेचे भाव जास्त आहे. ते १२५ टका प्रती किलो आकारतात. नफा मिळत नसल्याने अनेक किरकोळ विक्रेते साखर विकणे टाळत आहेत, असे त्यांनी सांगितले. तर अली हुसेन या विक्रेत्याने सांगितले की, ग्राहकांना साखरेसह सर्व वस्तू एकाच दुकानात मिळत नसल्याने अडचण झाली आहे. ग्राहक त्रस्त आहेत. सरकारने साखरेचे संकट लवकरात लवकर दूर करावे.
दरम्यान, रमजानच्या काळात बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी सरकारने साखरेच्या आयातीवरील नियामक शुल्क ५ ते २५ टक्क्यांपर्यंत कमी केले होते. मात्र, आता या सवलती नसल्याचे असे बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशनचे सरचिटणीस गोलाम रहमान यांनी सांगितले. टेरिफ सुविधा मागे घेण्यात आल्याने साखरेचे दर प्रती किलो ८ टकाने वाढले आहेत. दरात वाढ झाल्याने पॅकेज्ड साखरेचा उत्पादन खर्च वाढला आहे. जर आम्ही पॅकेज्ड साखरेचा पुरवठा केला तर तो दर सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ४.५ टका प्रती किलो अधिक असेल,” असे त्यांनी सांगितले. सरकारने दर प्रती किलो १४० टका करावा अशी मागणी असोसिएशनने केल्याचे ते म्हणाले.