बांगलादेश: स्थानिक रिफायनरींकडून साखर खरेदी करण्याचा सरकारकडे आग्रह

ढाका : बांगलादेशातील साखर रिफायनरींनी बफर स्टॉक निश्चित करण्यासाठी सरकारला आपल्या सहयोगी सदस्यांकडून साखर खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. अशाच पद्धतीने पुढील महिन्यातील रमजानपर्यंत दर स्थिर ठेवले जाऊ शकतात असा दावा त्यांनी केला आहे. बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशनने (बीएसआरए) बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनला (बीएसएफआयसी) हा प्रस्ताव दिला आहे. असोसिएशनने उद्योग मंत्रालयाच्या स्थायी समितीकडून रमजानच्या काळात वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक साखर आयातीच्या शिफारशींच्या पार्श्वभूमीवर याचिका दाखल केली आहे.

गेल्या महिन्याच्या अखेरीस उद्योग मंत्रालयाच्या स्थायी समितीने रमजानच्या पवित्र महिन्यापूर्वी आवश्यक साखर आयात करण्याचा प्रस्ताव दिला होता. सद्यस्थितीत देशात पाच खासगी शुगर रिफायनरी आहेत. त्या जागतिक बाजारातून कच्ची साखर आयात करून त्यावर प्रक्रिया करुन त्याची विक्री करतात. खासगी रिफायनरींची वार्षिक उत्पादन क्षमता ४० लाख टन असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. दुसरीकडे देशात साखरेची वार्षिक मागणी २ ते २.२ मिलियन टन आहे.
बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशनने सांगितले की, जर सरकारला वाटत असेल की, पुढील रमजानच्या महिन्यात साखरेच्या बाजारात उतार-चढाव होण्याची शक्यता आहे आणि सरकारी स्तरावर साखर साठवणुकीची गरज भासत असेल तर आम्ही आंतरराष्ट्रीय बाजार, उत्पादन खर्च, शुल्क संरचनेच्या अधीन राहून साखरेचा गरजेनुसार पुरवठा करण्यास सहमत आहोत. बीएसएफआयसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला अलिकडेच देशातील शुगर रिफायनरी असोसिएशनकडून त्यांची साखर खरेदी करण्याचा प्रस्ताव मिळाला आहे. मात्र, आम्ही त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here