मालेगाव सहकारी साखर निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जोरदार पुनरागमन

177

बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मोठे यश मिळाल्यामुळे सत्ताधारी असलेल्या रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे या गटाला जोरदार धक्का बसला आहे. एकूण 21 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलला 16 जागा मिळाल्या आहेत. तर, भाजप पुरस्कृत तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलला केवळ 5 जागा मिळाल्या आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल हाती आले आहेत. या निकालानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत गटाने एकहाती विजय मिळवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. काही करुन ही निवडणूक जिंकायचीच असा चंग बांधून गेले चार दिवस अजित पवार या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेऊन होते.

अजित पवार यांच्या वर्चस्वातून धक्कादायक रित्या तावरे गटाच्या सहकार बचाव पॅनलने मागच्या निवडणुकीत हा कारखाना ताब्यात घेतला होता. मात्र, गतपराभवाचा वचपा काढत अजित पवार यांनी पुन्हा एकदा माळेगाव कारखान्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी 56 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी दोन्ही पॅनलचे प्रत्येकी 21 आणि 14 अपक्ष उमेदवार आहेत. या निवडणुकीसाठी 23 फेब्रुवारी या दिवशी मतदान पार पडले. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा या कारखान्याचे सभासद आहेत. त्यामुळे या कारखान्यात घडणाऱ्या घडामोडींवर सर्वांचेच लक्ष असते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here