भीमाशंकर साखर कारखाना पहिली उचल २९५० रुपये देणार : अध्यक्ष बाळासाहेब बेंडे

पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये पहिली उचल २९५० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

बाळासाहेब बेंडे म्हणाले की, गाळप हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दि. ६ जुलै २०२३ चे परिपत्रकान्वये द्यावयाचा एफ.आर.पी दर निश्चित केलेला आहे. त्याप्रमाणे कारखान्याचा २०२२-२३ गाळप हंगामातील सरासरी साखर उताऱ्यानुसार एफ.आर.पी दर प्रती मेट्रिक टन २८५३.५७ रुपये येत आहे. त्यानुसार २०२३-२४ हंगामात गाळप होणा-या ऊसासाठी पहिली उचल २९५० रुपये प्रती मेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कारखान्याचा गाळप हंगाम दि. ७ नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून आतापर्यंत एक लाख ५५ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप झालेले आहे. कारखान्याने नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. कारखान्याने आधुनिकीकरण व विस्तारीकरणाची कामे केल्यामुळे गाळप क्षमतेत वाढ झालेली असल्याने ऊस उत्पादकांचे संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप होण्यास मदत होणार आहे. तरी कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here