कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीने २४ जागा जिंकल्या. विरोधी दादासाहेब पाटील-कौलवकर पॅनेलने फक्त एका जागेवर विजय मिळवले. अटीतटीच्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील यांचा करिष्मा पहायला मिळाला. धैर्यशील पाटील-कौलवकर यांनी विजयश्री खेचून आणली. कारखान्याच्या निवडणुकीत २७ हजार मतदारांपैकी २३ हजार ७९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ३६ टेबलांवर मतमोजणीचे नियोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृह, रमणमळा येथे सोमवारी मतमोजणी झाली.
कारखान्याच्या निवडणुकीत २५ जागांसाठी ८१ उमेदवार रिंगणात होते. सत्तारुढ शिवशाहू परिवर्तन आघाडी, संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडी अशी तिरंगी लढत झाली. निकालात सत्तारुढ २४ विरुद्ध १ असा निकाल जाहीर झाला. मतमोजणीत सत्तारूढ राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीचे उमेदवार आघाडीवर राहिले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. आमदार पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीचे २४ उमेदवार, तर संस्थापक दादासाहेब पाटील- कौलवकर आघाडीचे प्रमुख माजी चेअरमन धैर्यशील पाटील यांनी शेवटच्या फेरीअखेर आघाडीवर होते. निवडणूक अधिकारी म्हणून नीलकंठ करे, सहायक निवडणूक अधिकारी सुनील धायगुडे यांनी काम पाहिले.