भोगावती साखर कारखान्यातर्फे मानधनधारक कुस्ती स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यातर्फे शुक्रवारपासून (दि. २२ डिसेंबर) कार्यक्षेत्रातील मल्लांसाठी मानधनधारक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी (दि. २४) निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील-देवाळेकर, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.

भोगावती साखर कारखाना व दादासाहेब पाटील ट्रस्टतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शुक्रवारी व शनिवारी कार्यक्षेत्रातील मल्लांसाठी २५ किलोपासून ९० किलोपर्यंत विविध अकरा वजनी गटांत मानधनधारक स्पर्धा होणार आहे. यातील विजेत्यांना वर्षभर कारखान्यामार्फत मानधन दिले जाणार आहे.

दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. कारखाना कार्यस्थळावरील दादासाहेब पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन आ. पी. एन. पाटील- सडोलीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आ. प्रकाश आबिटकर, माजी आमदार संपतराव पवार- पाटील, के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे, बाजार समितीचे अध्यक्ष भारत पाटील-भुयेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दुपारी ३ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या ‘भोगावती साखर केसरी’ साठी गणेश जगताप (पुणे) व महाराष्ट्र केसरी बाला रफिक (सोलापूर) यांच्यात झुंज होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या ‘भोगावती कामगार केसरी’ किताबासाठी इचलकरंजीचा मल्ल श्रीमंत भोसले आणि सुपणे येथील मल्ल दिग्विजय जाधव यांच्यात लढत होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या ‘भोगावती ऊस वाहतूक केसरी’ किताबासाठी मोतीबाग तालमीचा मल्ल बाबा रांगे व सांगलीचा मल्ल मंगेश बेले यांच्यादरम्यान लढत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here