अमेरिकेत आज बायडेन यांचा शपथविधी सोहळा, वॉशिंग्टनमध्ये २५ हजार सैनिक तैनात

नवी दिल्ली : अमेरिकेत बुधवारी नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेचा अभूतपूर्व सोहळा होत आहे. ज्यो बायडन आज राष्ट्रपती पदाची शपथ घेतील.

सोबत कमला हॅरिस या उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री १०.३० वाजता बायडेन आणि कमला हॅरिस यांचे शपथग्रहण होईल. या समारंभासाठी वॉशिंग्टनमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्यांदाच २५ हजार अमेरिकन सैनिक वॉशिंग्टनमध्ये पहारा देतील.

६ जानेवारी रोजी अमेरिकन संसदेत जे काही घडले, त्यामुळे लोकशाही प्रणालीवर प्रश्नचिन्ह उमटल्याची भावना आहे.

या घटनेवर रिपब्लिकन पक्षाने खेद व्यक्त केलेला नाही तर उलट ट्रम्प यांचे समर्थक बायडेन यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेत ठिकठिकाणी गोंधळ घालतील अशी शक्यता आहे. अमेरिकेची सर्वात मोठी सुरक्षा यंत्रणा असलेल्या एफबीआयनेही यास पुष्टी दिली आहे. त्यामुळे वॉशिंग्टनला अभेद्य किल्ल्याचे स्वरुप आले आहे.

समारंभाचे स्वरुप बदलले
ट्रम्प यांच्या समर्थकांकडून गोंधळाची शक्यता असल्याने राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या शपथविधी समारंभाचे संपूर्ण स्वरुप बदलण्यात आले आहे.

बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधी समारंभात कपात करण्यात आली आहे. ज्यो बायडेन यांच्या टीमने अमेरिकन नागरिकांना राजधानी वॉशिंग्टनमध्ये येऊ नये असे आवाहन केले आहे.

कोरोना महामारीच्या संक्रमणाची धास्ती असल्याने लोकांना घरातच बसून टीव्हीवर शपथविधी समारंभ पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शपथविधी समारंभासाठी तयार केलेल्या परेड मार्गासोबतच प्रेक्षक गॅलरीची उंची कमी केली आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस हे दोघेही कॅपिटल हिलसमोर शपथ घेतील.

समारंभात समोर २०० जणांची उपस्थिती
शपथ ग्रहण समारंभात २०० जणांची उपस्थिती समोर असेल. यापूर्वी राष्ट्रपतींच्या शपथ ग्रहण सोहळ्यात २ लाख तिकिटांचे वितरण केले जात होते.

मात्र, कोविड १९च्या धास्तीने फक्त १००० तिकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत अमेरिकेत राष्ट्रपतींच्या शपथ ग्रहणावेळी पेन्सिल्व्हेनिया अव्हेन्यूपासून व्हाइट हाउसपर्यंत सैनिकांची परेड आयोजित केली जात होती. मात्र, आता ही परेड व्हर्च्युअल रुपात होईल.

बँड आणि ड्रम
राष्ट्रपती बायडेन आणि उप राष्ट्रपती कमला हॅरिस आणि त्यांच्या कुटूंबीयांना सैनिक व्हाइट हाउसमध्ये नेतील.

त्यांचे स्वागत सेनेच्या बँड आणि ड्रम या वाद्यांनी होईल. ट्रम्प समर्थकांकडून हिंसेची शक्यता असली तरी कार्यक्रमात काही नव्या गोष्टी असतील.

पॉप स्टार लेडी गागा राष्ट्रगीत म्हणतील. तर गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ या म्युझिकल परफॉर्मन्स सादर करतील. बायडेन यांच्या शपथविधीनंतर अभिनेता टॉम हॅक्स ९० मिनिटांचा टेलिव्हीजन शो करतील.

अमेरिकेतील बहूतांश चॅनल्सकडून शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपण होईल.

पारंपरिक कोलम
ज्यो बायडेन आणि हॅरिस यांच्या स्वागतासाठी तमीळ वंशाच्या महिलांकडून पारंपरिक कोलम तयार करण्यात येत आहे. तमीळनाडीत कोलमची कलाकृती प्रत्येक शुभ कार्यक्रमावेळी तयार केल्या जातात. कमला हॅरीस या मूळ तमीळ वंशाच्या असल्याने याचे आयजन करण्यात आले आहे.

बायडेन यांच्या शपथ ग्रहण समारंभात पूर्वी न घडलेल्या काही गोष्टी आता घडत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने व्हाइट हाउसमधून पदउतार होत आहेत, ते अभूतपूर्व आहे. ट्रम्प आपली हार मानण्यास तयार नाहीत. ते राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्यातही सहभागी होणार नाहीत.

शिवाय, आपले निरोपाचे भाषणही देण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यांच्याजागी उप राष्ट्रपती माइक पेन्स समारोपाचे भाषण देतील.

हिंसाचाराचा अलर्ट
कडेकोट सुरक्षेमुळे व्हाइट हाउसला किल्ल्याचे स्वरुप आले आहे.

तीन लेअर्समध्ये ही सुरक्षा आहे. संसद भवन कॅपिटल हिल, त्याच्या आसपासचा परिसर, पेसिल्वेनिया अव्हेन्यू आमि व्हाइट हाउसला सर्वसामांन्य नागरिकांपासून लांब ठेवण्यात आले आहे.

पूर्ण शहरात हाय अलर्ट असून कॅपिटल बिल्डिंगच्या आसपास सुरक्षा दलांचा पहारा आहे. वॉशिंग्टनमध्ये सुरक्षेसाठी २५ हजार नॅशनल गार्ड्स तैनात आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here