बिद्री कारखान्याचा महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रति टन ३४०७ रुपये दर जाहीर

कोल्हापूर : श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने (बिद्री) गळीत हंगाम 2023-24 साठी उसाला राज्यात सर्वाधिक प्रतिटन 3407 रुपये दर जाहीर केला. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या सर्व 25 उमेदवारांनी विजय मिळवला. 15 डिसेंबर रोजी नवीन संचालक मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली. याच सभेत सलग चार वेळा अध्यक्षपद भूषविणारे माजी आमदार के. पी.पाटील यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली. याच बैठकीत के. पी. पाटील यांनी ऊस दराची घोषणा केली. त्यांनी बिद्रीने दिलेला ऊस दर महाराष्ट्रातील इतर कोणत्याही कारखान्यांपेक्षा जास्त असल्याचा दावा केला.

के.पी.पाटील म्हणाले की, एफआरपीनुसार बिद्री कारखान्याचा उसाचा दर प्रति टन 3200 रुपये होतो. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 3200 रुपये जमा करण्यात आले आहेत. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नवनिर्वाचित संचालक मंडळाने प्रति टन 3407 रुपये दर देण्याचा निर्णय घेतल्याचे के.पी.पाटील यांनी जाहीर केले. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अगोदरच 3200 रुपये जमा झाले आहेत, त्यांना 207 रुपयांचा दुसरा हप्ता गळीत हंगाम संपताना दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गत हंगामात बिद्री साखर कारखान्याने 12.62 रिकव्हरीसाठी 3209 रुपये प्रतिटन दर दिला होता. गेल्या हंगामात कारखान्याने 8 लाख 80 हजार टन उसाचे गाळप केले होते.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील उसाला प्रती टन ३,२०० रुपये या दराने बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here