राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तर अजित पवार उपमुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी भाजपला संपूर्ण राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे की, अजित पवारांसोबत आमदारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महिनाभर नुसते चर्चेचे गुऱ्हाळ चालू होते मात्र त्यामधून कोणताही तोडगा निघत नव्हता. त्यामुळे स्थिर सरकार स्थापन कसे होणार हा प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला जी जबाबदारी दिली आहे ती निश्चितपणे चांगल्यापद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. अचानक आलेल्या राजकीय भूकंपामुळे मात्र अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. शिवसेना आणि काँग्रेसला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी केली का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली का? अजित पवार महाविकास आघाडीत होत असलेल्या चर्चांबाबत नाराज होते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आले नव्हते. शेतकऱ्यांसह राज्य अनेक अडचणींचा सामना करत होते. त्यामुळे स्थिर सरकार बनवण्यासाठी हा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर राजभवनात दिली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here