बिहारमध्ये गुंतवणुकीसाठी मोठी झेप, दिल्लीत १२ मे रोजी इन्व्हेस्टर्स मीट

पाटणा : बिहारच्या उद्योग विभागाने राज्याच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी १२ मे रोजी दिल्लीत गुंतवणुकदारांसाठी बैठकीचे आयोजन केले आहे. अलिकडेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला पूर्णिया जिल्ह्यातील गणेशपूरमध्ये देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन केले. यामध्ये पूर्णिया, कटिहार, किशनगंज, अररिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल. वाढत्या औद्योगिक विकासाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३०,००० कोटी रुपयांची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. गुंतवणुकीच्या या संभाव्य क्षेत्रांमध्ये खाद्य पदार्थ प्रक्रिया, चामड्याचे साहित्य, कपडे, वस्त्रोद्योग, मेगा फूड पार्कचा समावेश आहे.

याबाबत दैनिक नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्याचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांच्या म्हणण्यानुसार, देशभर आणि काही परदेशातील गुंतवणूकदारांनी राज्याच्या वाढत्या प्रगतीत सहयोग देण्याची ईच्छा दर्शवली आहे. त्यातील अनेकजण बारा मे रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होतील. सूत्रांनी सांगितले की, विभागाकडून बदलत्या काळात राज्यातील उपलब्ध व्यापार संधींचे सादरीकरण केले जाईल. रस्ते, पूल, वीज अशा पायाभूत सुविधांमध्ये खूप सुधारणा केली आहे. या गुंतवणूकदारांना बिहार औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. राज्यातील १७ इथेनॉल प्रस्तावांना यापूर्वीच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here