नवी दिल्ली : देशाच्या निम्म्या भागात संततधार पावसाने नागरिक हवालदिल झाले आहेत. पश्चिम बंगाल, बिहार, युपी, महाराष्ट्र, कर्नाटकसह अनेक राज्यांत गुरुवारी जोरदार पाऊस झाला. बिहारमधील पुरामुळे अनेक गावे पाण्यात बुडाली. तर हवामान विभागाने पुढील २४ तासांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अॅलर्ट जारी केला आहे. आयएमडीने सांगितले की उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये शुक्रवारी जोरदार वाऱ्यासह मध्यम पाऊस कोसळेल. काही ठिकाणी वीज कोसळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्येही जोरदार पावसाचा अॅलर्ट देण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये तसेच पश्चिम बंगालच्या गंगेच्या परिसरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीमध्ये पुढील चार दिवस ढगाळ हवामान राहील. बिहारमध्ये सध्या चंपारण्य परिसरात पुराची स्थिती आहे. पाणी नदीतून अनेक गावांमध्ये घुसले आहे. गोपालगंजमध्ये गंडक नदीच्या पुरामुळे नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. गोपालगंजच्या ५० गावांमध्ये पाणी घुसले असून अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. बंगालमध्येही संततधार पाऊस सुरू आहे. कोलकातामध्ये अनेक ठिकाणी रस्ते, नागरी वस्त्या पाण्यात बुडाल्या आहेत. आणखी तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत हवामान विभागाने पावसाचा अॅलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अॅलर्ट असून अहमदाबादमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे. येथील विमानतळावर पावसाने चार विमानांचे नुकसान झाले. दिल्लीत मॉन्सून उशिरा येत आहे. मात्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा येथेही अद्याप स्थिती अनुकूल नाही. पुढील दोन -तीन दिवस गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागात मान्सूनची गती संथ राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत उत्तर प्रदेशच्या काही भागातून मान्सून पुढे सरकेल. त्यामुळे पावसाची शक्यता वाढली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link