बिहार: साखर कारखाना सुरू करण्यासाठी सीतामढीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

सीतामढी : जिल्ह्यातील एकमेव रिगा साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेला शेकडो एकरातील ऊस खराब होत आहे. राज्य सरकारने याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने शेतकऱ्यांचा ऊस शेतीपासून मोहभंग होत आहे. कारखाना सुरू करण्याबाबत पावले उचलली गेली नाहीत, तर एक दिवस येथील ऊस शेती संपून जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या आर्थिक विकासासाठी कारखाना पुन्हा सुरू करणे आवश्यक असल्याचे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. कारखाना पुन्हा सुरू करावा या मागणीसाठी शेतकरी नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संयुक्त किसान मोर्चाच्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी बाजारपेठ बंद पाडली. रिगा साखर कारखाना सुरू करा, शेतकरी-कामगारांचे जीवन वाचवा अशा घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाचे संस्थापक डॉ. आनंद किशोर यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. तब्बल चार तास रस्ते आणि बाजारपेठ बंद राहिली. स्थानिक पोलीस प्रशासनाने लोकांची समजूत काढून चक्काजाम हटविण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर लांबलचक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कारखाना २०२० पासून बंद आहे. तो सुरू करण्यासाठी सरकार आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात अनेकवेळा बैठका झाल्या. जवळपास ४०,००० शेतकरी, व्यावसायिक कारखान्याशी संलग्न आहेत. दोन महिन्यापू्र्वी मुख्यमंत्री नीतीश कुमार समाधान यात्रेदरम्यान सीतामढीत आले होते. यादरम्यान, त्यांनी कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही न केल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. कारखान्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांची ऊस बिले थकवली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here