पटणा : बिहारच्या ऊस पट्ट्यातील ४०-४० शेतकऱ्यांच्या समुहांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात ३०० प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे हे कार्यक्रम विभाग अथवा पंचायत स्तरावर असतील, अशी माहिती ऊस उद्योग विभागाच्या सुत्रांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने शेती करावी आणि अधिकाधिक उत्पादन मिळवावे, ऊसाच्या गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, यासाठीच्या प्रत्येक प्रशिक्षणासाठी १४ हजार रुपये खर्च येणार आहे. निधीची तरतूद करण्यात आली असून प्रशिक्षण कार्यक्रम पुसा, समस्तीपूर आणि मोतीपूर ऊस संशोधन केंद्रातील कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. याशिवाय यामध्ये कृषी विज्ञान केंद्रातील वैज्ञानिक, कृषी पदाधिकारी, कृषी समन्वयक, ऊस उद्योग विभागाचे पदाधिकारी आदी सहभागी होतील. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी १०० रुपयांचा प्रशिक्षण भत्ताही दिला जाणार आहे.
बिहारच्या १५ जिल्ह्यांमध्ये ऊस शेती केली जाते. यामध्ये उत्तर बिहारमधील पश्चिम चंपारण्य, पूर्व चंरापण्य, गोपालगंज, सीतामढी, समस्तीपूर, मुजफ्फरपूर, सीवान, भागलपुर, दरभंगा, सहरस, पूर्णिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय जमुई, भोजपूर, गया आणि पाटणामध्येही ऊस शेती केली जाते. सेंद्रीय शेतीला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.