मधुबनी: बिहारमध्ये सर्वात मोठा इथेनॉल प्लांट मधुबनीतील लोहट येथे स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी जमीन संपादन करण्यात आली आहे अशी माहिती, उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी दिली. चानपुरा, बसैठ येथे एस. के. चौधरी शिक्षण संस्था संचलित कृषी विज्ञान केंद्रात आयोजित आंतरराष्ट्रीय आरोग्य महोत्सवासह मेगा अॅग्री एक्स्पोच्या तिसऱ्या दिवशी, सोमवारी कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री शाहनवाज हुसेन यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री हुसेन म्हणाले, आतापर्यंत पूर्णिया, आरा, गोपालगंज, परवतासह चार इथेनॉल प्लांट स्थापन करण्यात आले आहेत. मिथिलाला विकास आणि उद्योग क्षेत्राशी जोडण्याच्या योजनेंतर्गत काम केले जात आहे. दरभंगातील अशोक पेपर मिल व पंडोल येथील सूतगिरणीचा वाद सोडविण्यात येत आहे. उद्योग विभागाचे बजेट १६०० कोटी रुपयांचे आहे. विभागावर १९ लाख लोकांना रोजगार देण्याची जबाबदारी आहे. २०२५ पर्यंत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली काम केले जाणार आहे. बिहार व मिथिलांचल येथे विकास व उद्योगाचे जाळे विणले जाईल. मेगा टेक्स्टाइलसाठी १७०० हेक्टरच्या जमिनीची गरज आहे. त्याचा शोध आता सुरू आहे.
मंत्री हुसेन यांनी एस. के. चौधरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संत कुमार चौधरी यांच्या कामाचे कौतुक केले. मधुबनीचे भाजप खासदार डॉ. अशोक कुमार यादव यांनी शेतीला उद्योग बनविण्याची गरज व्यक्त केली. एलएनएमयूचे कुलपती डॉ. एस. पी. सिंह, माजी आमदार डॉ. दिलीप कुमार चौधरी, अशोक कुमार चौधरी, प्रो. शिवशंकर झा, डायरेक्टर जनरल पी. चंद्रशेखर, परवेज आलम, देवेंद्र प्रसाद यादव, उमाशंकर प्रसाद गुप्ता, शशिभूषण सिंह आदींची भाषणे झाली.