ऊस उत्पादनात बिजनौर जिल्हा पहिल्या क्रमांकावर, हंगामात सर्वाधिक गाळप

बिजनौर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा ऊस उत्पादनात इतर सर्व जिल्ह्यांना मागे टाकले आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप विभागात अव्वल ठरले आहे. शेजारील जिल्ह्यांतील साखर कारखानेही बिजनौरपेक्षा खूप पिछाडीवर आहेत. अद्याप जिल्ह्यातील कारखाने सुरू असून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे ऊसावर रोगाचे प्रमाण कमी आहे. त्याचा फायदा यंदा झाला आहे.

जिल्ह्यातील जवळपास ६० टक्के जमिनीत ऊसाचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी ऊसाशिवाय इतर पिके घेण्यास तयार नाहीत. उसाची लागवड आणि उत्पादन दरवर्षी वाढत आहे. यापूर्वी उसाची लागवड जास्त केली जायची. मात्र, उत्पादन कमी असायचे. आता शेतकरी चांगले बियाणे वापरत असल्याने उत्पादन वाढले आहे.

जिल्ह्यात उसाचे प्रती हेक्टर उत्पादन ९०० क्विंटल आहे. प्रचंड ऊस उत्पादन होऊनही दरवर्षी जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवर असतो. मात्र, यंदा हे चित्र बदलले. जिल्ह्यातील सर्व नऊ कारखान्यांमध्ये आतापर्यंत ११.२० कोटी क्विंटल उसाचे गाळप झाले. सर्वाधिक ऊस उत्पादक असलेला लखीमपुरखीरी जिल्हा बिजनौरपासून खूप पिछाडीवर आहे. अद्याप गाळप सुरू आहे. कारखान्यांशिवाय क्रशर आणि घाण्यांच्या माध्यमातूनही उसाचे गाळप झाले आहे.

यंदा बिजनौर जिल्ह्यात ११.२० कोटी क्विंटल ऊस उत्पादन झाले. तर लखीमपुरखीरीमध्ये १०.१५ कोटी क्विंटल उत्पादन झाले. त्या पाठोपाठ मुझफ्फरनगरमध्ये ९.९९ कोटी क्विंटल तर मेरठमध्ये ८.०९ कोटी क्विंटल ऊस उत्पादन झाले आहे. यंदा लाल सड रोगामुळे तर इतर जिल्ह्यांच्या ऊस उत्पादनाला फटका बसला. या रोगामुळे उसाचे उत्पादन, वजन घटते. जिल्ह्यात मात्र काही हेक्टरवर प्रादुर्भाव दिसला होता. यासंदर्भात जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह म्हणाले, आतापर्यंत जिल्ह्याचे ऊस उत्पादन सर्वाधिक आहे. इतर जिल्ह्यांमध्ये रोगाने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास ते पिक नष्ट करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here