भाजपचीही ऊस दर आंदोलनात उडी, वाहतूक रोखली

सांगली : विविध शेतकरी संघटनांपाठोपाठ आता भाजपनेही ऊस दर आंदोलंत उडी घेतली आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा शहर व परिसरात ऊस दराचे आंदोलन पेटले आहे. भाजपनेही आता आक्रमक भूमिका घेतल्याने भडका होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मिरजवाडी व कारंदवाडी येथे सर्वोदय राजारामबापू युनिट तीन व वसंतदादा दत्त इंडिया साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर अडवले. वाहनांच्या चाकातील हवा सोडण्यात आली. तर बावची फाट्यावर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

स्वाभिमानी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आष्टा, मर्दवाडी, बावची, पोखर्णी, नागाव, बागणी, काकाचीवाडी, रोझावाडी या परिसरात ऊसतोड बंद पाडली. तरीही ऊस वाहतूक सुरू राहिल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पेठ- सांगली रोडवर मिरजवाडी व कारंदवाडी येथे ५ ट्रॅक्टरमधील हवा सोडली. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. कार्यकर्ते व कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यात वाद झाला. त्यानंतर कारखाना प्रशासनाने उद्यापासून ऊस तोडणी बंद करू असे आश्वासन दिले.

दरम्यान, बावची फाट्यावरही आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी ५० हून अधिक ट्रॅक्टर रोखून धरले. तोडगा निघत नाही, तोपर्यंत ऊस ट्रॅक्टर सोडणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण माने, संदीप गायकवाड, विश्वजित पाटील, बाबासाहेब सांद्रे, जगन्नाथ भोसले, पंडित सपकाळ, प्रताप पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here