बिद्री साखर कारखाना निवडणुकीत भाजप ताकदीने उतरणार : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यात भाजपची चांगली ताकद आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षास डावलून कोणत्याही गटास निवडणूक जिंकता येणार नाही. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा अजेंडा घेऊन ताकदीने निवडणुकीत उतरून निवडणूक जिंकू, असा विश्वास शाहू ग्रुपचे अध्यक्ष, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.

दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (बिद्री) निवडणुकीच्या नियोजनासाठी कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यांतील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची समरजितसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. घाटगे म्हणाले, निवडणूक केवळ लढवायची नाही तर जिंकायची आहे. त्यासाठी सर्वांनी एकसंधपणे, ताकदीने निवडणुकीला सामोरे जाऊया.

‘बिद्री’ चे माजी संचालक बाबासाहेब पाटील म्हणाले, बिद्री कारखान्याच्या मागील निवडणुकीत भाजपला ताकदीपेक्षा कमी जागा मिळाल्या. याची कसर या निवडणुकीत नेते मंडळी भरून काढतील. ‘बिद्री’साठी भाजप कार्यकर्ते ताकदीने लढण्यासाठी सज्ज आहेत. भाजपचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष राहुल देसाई म्हणाले, निवडणूक प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते. त्यासाठी तालुकावार सभासद व शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क दौरे सुरु करावेत. गोकुळचे माजी संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले, केंद्रात व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून जास्तीत जागा पदरात पाडून घेण्यासाठी नेतेमंडळींनी प्रयत्न करावेत.

यावेळी भाजपचे संघटन मंत्री नाथाजी पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, प्रताप पाटील-कावणेकर, प्रदीप पाटील, अनिल तळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्रकाश कुलकर्णी, धोंडीराम मगदूम, देवराज बारदेस्कर, दत्तामामा खराडे, वसंतराव पाटील उपस्थित होते. स्वागत संजय पाटील यांनी केले. आभार सुमित चौगुले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here