रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑईल फ्यूचर्स गुरुवारी १०० डॉलर प्रती बॅलरपेक्षा अधिक स्तरावर पोहोचले.
सुरुवातीच्या आशियाई व्यापारात ब्रेंट क्रूड १०१.३४ डॉलर प्रती बॅरलच्या उच्च स्तरावर आले. सप्टेंबर २०१४ नंतर हा दर सर्वाधिक आहे. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट (WTI) क्रूड फ्यूचर्स 4.22 $ अथवा ४.६ टक्क्यांनी वधारुन 96.32 $ प्रती बॅरलवर पोहोचले. नंतर ते 96.51 $ वर गेले. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार ऑगस्ट २०१४ नंतरचा हा सर्वाधिक दर आहे.
रशियाने युक्रेनमध्ये सैनिकांना घुसवल्यानंतर ही स्थिती निर्माण झाली आहे. या युद्धामुळे युरोपातील जागतिक ऊर्जा पुरवठा अडचणीत येऊ शकतो अशी चिंता व्यक्त होत आहे. परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्विट केले आहे की, रशियाने युक्रेनवर जोरदार आक्रमण केले आहे. शस्त्रांनी शहरांना लक्ष्य बनवले जात आहे.
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी गुरुवारी पूर्व युक्रेनमध्ये सैन्याच्या एका मोहिमेची घोषणा केली. नाटोच्या पूर्व विस्ताराची समाप्ती करण्याच्या रशियाच्या मागणीवर युरोपमध्ये युद्धाची सुरुवात यातून होऊ शकते.