बीएसएनएल चा पाय अधिक खोलात, पुन्हा थकला पगार

नवी दिल्ली :बीएसएनएल  (भारत संचार निगम लि.) व एमटीएनएल (महानगर टेलिफोन निगम लि.) या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या एकत्रीकरणाच्या शक्यतेमुळे या कंपन्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांच्या पगार प्रश्‍नाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांचा सप्टेंबरचा पगार अद्याप झालेला नाही. यामुळे कर्मचार्‍यांच्यात कमालीचा असंतोष पसरला आहे. हा पगार दिवाळीपूर्वी देण्यात येईल, असे बीएसएनएलचे सीएमडी पी. के. पुरवार यांनी म्हटले आहे.

बीएसएनएलला व्यावसायिकांकडून तीन हजार कोटी रुपयांचे येणे असून यातील काही रक्कम वसूल होण्याची शक्यता आहे. तसेच, यासह काही अंतर्गत स्रोतांच्या साह्याने कर्मचार्‍यांचा पगार दिला जाईल, असे पुरवार म्हणाले. बीएसएनएलच्या कर्मचार्‍यांच्या मासिक देयकाची एकूण रक्कम 850 कोटी रुपये आहे. बीएसएनएलला दरमहा 1,600 कोटी रुपयांचे उत्पन्न होते, मात्र यातील मोठा हिस्सा हा कार्यगत व अनिवार्य खर्चांसाठी वापरला जातो. यामुळे पगार देयकांसाठी पुरेसा निधी उरत नाही. या कंपनीला मार्च 2019 अखेरीस 13,804 कोटी रुपये निव्वळ तोटा झाला आहे.

बीएसएनएलमध्ये 1.76 लाख कर्मचारी असून या कंपनीच्या उत्पन्नापैकी 65 ते 70 टक्के निधी पगार खात्यावरच खर्च होतो. गेल्या अनेक महिन्यांपासून या कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या पगारात अनियमितता आहे. एमटीएनएलमध्येही हीच स्थिती आहे. 18 ऑक्टोबरपूर्वी पगार न झाल्यास उपोषण वआंदोलन करण्याचा इशारा बीएसएनएलच्या कर्मचारी संघटनांनी दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर पूरवार यांनी हे आश्‍वासन दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here