केंद्र सरकार पुढील आठवड्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी पुन्हा तांदळाचा पुरवठा करण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून पुढील आठवड्यापासून धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादक प्रकल्पांना (डिस्टलरी) FCI तर्फे पुन्हा तांदळाचा पुरवठा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील महिन्यात FCI ने डिस्टलरीना तांदूळ विक्री बंद केली. त्यानंतर देशातील अनेक डिस्टलरीना कच्चा मालाअभावी आपली उत्पादन थांबविणे भाग पडले आहे. त्याचा थेट परिणाम इथेनॉल उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळेच धान्यावर आधारित इथेनॉल उत्पादन करणाऱ्या काही प्रमुख डिस्टलरी चालकांशी शनिवारी (१९ ऑगस्ट २०२३) सरकारने चर्चा केल्याचा दावा ET NOW या वृत्तवाहिनीने केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FCI ने यंदा इथेनॉल उत्पादनासाठी डिस्टलरीना 34 लाख टन तांदूळ विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. पण आतापर्यंत FCI ने केवळ 14 लाख टन तांदळाचा पुरवठा केला आहे. त्याचाही परिणाम इथेनॉल उत्पादनावर झाला आहे. त्यातच आता FCI ने तांदूळ विक्री बंद केल्याने देशातील 100 पेक्षा जास्त डिस्टलरीना फटका बसला आहे.

FCI च्या निर्णयामुळे 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर यावर्षीच्या अखेरपर्यंत निश्चित करण्यात आलेले 14 टक्के ध्येय गाठणेही मुश्कील झाले आहे. सरकार ने या सर्व बाबींचा अभ्यस करून डिस्टलरीना त्यांच्या गरजेनुसार टप्प्याटप्याने तांदूळ विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही ET NOW वृत्तवाहिनीने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here