केंद्र सरकारने साखरेची ‘एमएसपी’ वाढविण्याची गरज : वैभव नायकवडी

सांगली : घरगुती वापराच्या साखरेचा दर वेगळा व उद्योगाला लागणाऱ्या साखरेचा दर शासनाने वेगळा केला तरच साखर उद्योग सावरला जाईल, असे प्रतिपादन हुतात्मा संकुलांचे नेते वैभव नायकवडी यांनी केले. येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाचा नायकवडी यांच्या हस्ते मोळी टाकून प्रारंभ करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.

वैभव नायकवडी म्हणाले, खोडवा उसाची पुरेशी वाढ झालेली नाही. नवीन ऊस लागणी खोळंबल्या आहेत. साखरेचा दर वाढलेला असतानाही सरकारने निर्यात बंदी घातली आहे. ऊस कमी आहे, त्यामुळे ७० ते १०० दिवसांपर्यंत हंगाम चालेल. ‘एमएसपी’वर सरकार अडून बसले असून ती वाढणे गरजेचे आहे. कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी स्वागत केले. हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुषमा नायकवडी, दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, वीरधवल नायकवडी, बाळासाहेब नायकवडी, वसंत वाजे, विलासराव , थोरात, विशाखा कदम यांच्यासह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here