माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी दिला राजीनामा

पुणे : माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष सागर जाधव यांनी बुधवारी (६ सप्टेंबर) राजीनामा दिला आहे. आता कोणाला अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची संधी मिळणार, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत अजित पवार यांचा न निर्णय अंतिम राहणार आहे. बाळासाहेब तावरे यांनी एकूण १८ वर्षे चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळला आहे. अध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने संचालक योगेश जगताप, नितीन सातव, मदनराव देवकाते, ॲड. केशवराव जगताप, सुरेश खलाटे, ज्येष्ठ संचालक तानाजी कोकरे इच्छुक असल्याचे समजते.

तावरे यांनी ४२ महिने अध्यक्ष, तर जाधव यांनी १२ महिने कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, माझ्या जास्तीच्या वयामुळे आणि माझी तब्येत साथ देत नसल्या कारणाने मी राजीनामा देत आहे. हे राजीनामे बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे सोपवले आहेत. त्यांनी ते राजीनामे कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोकराव पाटील यांनी हे राजीनामे संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवले जाणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here