चांद्रयान-3 देशाच्या आशा आणि स्वप्ने आपल्यासोबत वाहून नेईल: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 या भारताच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

एका ट्वीट थ्रेडमध्ये पंतप्रधान म्हणालेः

” भारताच्या अंतराळ क्षेत्राचा विचार केला तर 14 जुलै 2023 हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला जाईल. चांद्रयान-3 या आपल्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा प्रवास सुरू होईल. ही उल्लेखनीय मोहीम आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्ने सोबत वाहून नेईल.

चांद्रयान-3 कक्षा उंचावण्याच्या प्रक्रियेनंतर चंद्राच्या कक्षेमध्ये सोडण्यात येईल. 300,000 किमी चे अंतर कापल्यानंतर हे यान येत्या काही आठवड्यात चंद्रावर पोहोचेल. या यानामध्ये असलेली शास्त्रीय उपकरणे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतील आणि आपले ज्ञान आणखी वाढवतील.

आपल्या शास्त्रज्ञांच्या योगदानामुळे अंतराळ क्षेत्रात भारताचा समृद्ध इतिहास आहे. जागतिक चांद्र मोहिमांमध्ये चांद्रयान-1 ही मोहीम ऐतिहासिक मानली जाते कारण या मोहिमेद्वारे चंद्रावर पाण्याचे रेणू असल्याची पुष्टी करण्यात आली होती. जगभरातील 200 पेक्षा जास्त वैज्ञानिक पत्रिकांमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले होते.

चांद्रयान-1 या मोहिमेपर्यंत चंद्र म्हणजे एक शुष्क, भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या निष्क्रिय आणि निवास करण्यास अयोग्य पृष्ठभाग मानला जात होता. मात्र, आता पाण्याच्या अस्तित्वामुळे आणि उप-पृष्ठीय बर्फामुळे तो गतिशील आणि भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या सक्रीय पृष्ठभाग मानला जात आहे. कदाचित भविष्यात तो निवासासाठी योग्य ठरू शकेल!

चांद्रयान-2 ही मोहीम देखील तितकीच ऐतिहासिक होती कारण या मोहिमेतील चंद्राच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपकरणाने पहिल्यांदाच रिमोट सेन्सिंगद्वारे क्रोमिअम, मँगनीज आणि सोडियमच्या अस्तित्वाचा शोध लावला होता. या माहितीमुळे देखील चंद्राच्या भूगर्भ उत्क्रांतीचा सखोल अभ्यास करता येईल.

चांद्रयान-2 च्या महत्त्वाच्या शास्त्रीय फलनिष्पत्तींमध्ये पहिलावहिला लुनार सोडियमचा जागतिक नकाशा, चंद्रावरील खळग्यांच्या कमीअधिक आकाराच्या कारणांविषयी अधिक जास्त माहिती, आयआयआरएस उपकरणाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या बर्फाचा शोध आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. या मोहिमेची माहिती सुमारे 50 प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चांद्रयान-3 मोहिमेला शुभेच्छा! या मोहिमेविषयी आणि अंतराळ , विज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात आपण सातत्याने करत असलेल्या प्रगतीची जास्तीत जास्त माहिती घेण्याचे मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. याचा तुम्हा सर्वांना अतिशय अभिमान वाटेल.”

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here