कोल्हापूर : कोल्हापूर शहरातून परिसरातील काही कारखान्यांची ऊस वाहतूक ट्रक, टॅक्टर, ट्रॉली, बैलगाड्या यांच्यातून केली जाते. त्यामुळे शहरात वाहनांची कोंडी आणि गर्दी होत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरक्षित ठेण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने ऊस वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. साखर कारखान्यांना वाहतुकीचा मार्ग ठरवून दिला असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले की, शहराच्या विविध भागातून छत्रपती राजाराम, डी. वाय. पाटील, कुंभी, बिद्री, भोगवती, दत्त दालमिया या कारखान्यांसाठी ऊस वाहतूक केली जाते. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. ऊस वाहतुकीची भरलेली किंवा रिकामी वाहने शहराच्या आतील मार्गावरून ये-जा करणार नाहीत याचे नियोजन केले आहे. यामध्ये क्रशर चौक, इंदिरा सागर, हॉकी स्टेडियम, शेंडा पार्क, सायबर चौकाचा समावेश आहे.
शहरातील ताराराणी चौकातून दाभोळकर कॉर्नर, सीपीआर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी ते गंगावेस या मार्गावरून उसाची अथवा रिकाम्या वाहनांची वाहतूक करता येणार नाही. दालमिया कारखान्याकडे ऊस वाहतुकीसाठी फुलेवाडी नाका, हॉकी स्टेडियम,उचगाव एनएच ४ शिये, कसबा बावडा, शिये, भुये, वडणगे हा मार्ग २४ तास खुला राहील. शिवाय कोयास्को चौक ते तावडे हॉटेल, ताराराणी चौक, धैर्यप्रसाद हॉल, पोलिस अधीक्षक कार्यालय, सीपीआर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून दालमिया कारखान्याकडे ये-जा करणारी वाहने रात्री १० वाजल्यानंतर ठराविक काळातच वाहतूक करतील, असे नियोजन केले आहे.