छत्रपती संभाजीनगर: गेवराई ते मध्य प्रदेश यांदरम्यान साखर वाहतूक करणाऱ्या मालट्रकाचा अजिंठा घाट वळणावर अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात ट्रक कोसळला. अपघातात चालक व मदतनीस दोघेही गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ट्रकचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर साखर दरीत पसरली.
लोकमत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेवराई येथून काल सकाळी माल ट्रक मध्य प्रदेशातील हरदा येथे साखरेची वाहतूक करत होता. अजिंठा घाटातून जात असताना एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्यावरून उलटून थेट दरीत कोसळला. अपघातात चालक कचरुमल राठोड आणि क्लिन्नर सुनोजय कर्मा हे जखमी झाले. दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी असून त्यांच्यावर अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दोघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.