बीड जिल्ह्यातील मुले शाळेऐवजी कोल्हापूरमध्ये उसाच्या फडात

बीड : कोल्हापूर येथील ‘अवनी’ या स्वयंसेवी संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यात ११ कारखान्यांवर जाऊन सर्वेक्षण केले आहे. यात ० ते १८ वयोगटातील तब्बल १८३९ मुले, मुली हे अंगणवाडी, शाळा सोडून उसाच्या फडात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी समग्र शिक्षाअंतर्गत २२० हंगामी वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. या वसतीगृहात २१,४९० मुले असल्याचा दावा बीडचा शिक्षण विभाग करत आहे. परंतु या सर्वेक्षणामुळे मुले शिक्षण सोडून फडातच असल्याचे उघड झाले आहे.

अवनी या संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील ११ कारखान्यांचे सर्वेक्षण केले. यात जी शाळाबाह्य मुले आढळली, त्यांची यादी त्यांनी बीडच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांना पाठवली. आता त्यांच्याकडून उलट तपासणी सुरू आहे. यातून शिक्षण विभागाचा दावा फोल ठरला आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न अजूनही पूर्ण यशस्वी झाला नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरमधील ११ कारखान्यांवर जर १,८३९ मुले आढळत असतील तर राज्यातील सर्व कारखान्यांची माहिती घेतली तर हा आकडा फुगण्याची दाट शक्यता असल्याचे स्वयंसेवी संस्थांचे म्हणणे आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेने समग्र शिक्षाअंतर्गत जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या २१ हजार ४९० मुलांचे स्थलांतर रोखले असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here