बिजींग : एक कर्मचारी कोविड संक्रमित असल्याचे आढळून आल्यानंतर चीनने जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त बंदर निंगबो-झौशानला अंशतः बंद केले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील व्यापाराचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय नजिकच्या काळात मालाचे वितरण, पुरवठ्यालाही फटका बसेल.
निंगबो-झौशान बंदरातून मिळालेल्या निवेदनानुसार, निंगबो-झौशान बंदरातील मीशान टर्मिनलवरील सर्व इनबाऊंड आणि आऊटबाऊंड कंटेनर सेवा पुढील सूचनेपर्यंत थांबविण्यात आल्या आहेत. बंदर बंद केल्यानंतर कार्गो हँडलिंग आणि शिपिंगवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चीनने यापूर्वी मे अखेरपर्यंत यान्टियन बंदर बंद केले होते. आता कोरोना विषाणूमुळे बंद करण्यात आलेले निंगबो-झौशान हे दुसरे बंदर आहे. यामुळे मालाच्या चढ-उताराच्या दरात वाढीची शक्यता आहे. बंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि मालाचा पुरवठा अडचणीत येणार आहे. टर्निमलशिवाय बंदरातील इतर टर्मिनलच्या माध्यमातून होणारी कंटेनर पाठविण्याची प्रक्रियाही संथ होण्याची शक्यता आहे.