चीनला निर्यात साखर उद्योगासाठी ठरेल संजीवनी

नवी दिल्ली : चीनी मंडी अतिरिक्त उत्पादनामुळे अडचणीत आलेल्या भारतातील साखर उद्योगाला चीनच्या माध्यमातून एक आशेचा किरण सापडला आहे. जगातील मोठी बाजारपेठ असलेल्या चीनला साखर निर्यात करण्याचे भारताचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, भारतात चीनच्या साखर उद्योगाचे एक शिष्टमंडळ आले आहे. त्यांनी दिल्ली, उत्तर प्रदेशसह अनेक भेटी दिल्या आहेत. साखरेची आयात करण्यासाठी भारतासोबत दीर्घकालीन करार करण्याचा चीनचा मनोदय दिसत आहे. अर्थात भारतासाठी चीनची साखर बाजारपेठ संजीवनी ठरणार आहे.

चीनचे सरकार त्यांना लागणाऱ्या साखरेचा कोटा साधारणपणे जानेवारी ते जून या दरम्यान जाहीर करते. मात्र, भारताने त्यांना २०१९साठीचा कोटा जानेवारीपूर्वीच जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. कारण, जानेवारीनंतर भारतातील साखर कारखाने शुद्ध प्रक्रियायुक्त साखर तयार करण्यास सुरुवात करतील. त्यानंतर चीनला लागणारी कच्ची साखर पुरवणे अवघड जाणार आहे. जर, डिसेंबरमध्येच साखरेचा कोटा जाहीर झाला, तर भारतीय निर्यातदारांना त्याचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.

सध्या भारतातून चीनला बासमती शिवाय इतर तांदूळ मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. चीनने जर कच्ची साखर आयात करण्यास सुरुवात केली, तर तांदळानंतर साखर दुसऱ्या क्रमांकाचा माल असणार आहे. सध्या चीनसाठी १५ हजार टन कच्ची साखर निर्यात करण्याचा करार झाल्याचे इस्माने सांगतिले आहे. चीनला वर्षाला २० लाख टन साखर निर्यात करता येईल, अशी अपेक्षा सध्या साखर उद्योगाला आहे.

चीनची बाजारपेठ भारतीय साखरेसाठी मोठी ग्राहक ठरू शकते, असे दी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरिज या संस्थेचे म्हणणे आहे. जर, त्यासाठीच्या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या, तर ते शक्य होणार आहे. सध्या भारत चीनला दर वर्षी २० लाख टन साखर निर्यात करण्याचे टार्गेट ठेवत आहे. त्याची सुरुवात २०१९पासूनच होण्याची शक्यता आहे. अर्थात त्यात वाढही होऊ शकते. सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेल्या चीनच्या शिष्टमंडळाने भारतातील साखर तयार करण्याची पद्धत, त्यावरील प्रक्रिया, साठवणूक आणि वाहतूक या विषयी समाधान व्यक्त केले आहे.

देशातील साखरेची मागणी २६० लाख टन आहे. त्याचवेळी भारतात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ४४० लाख टन साखरेचा साठा आहे. त्यात यंदाच्या हंगामातील साखरेचीही भर पडणार आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात गेल्या वर्षीपेक्षा जास्त साखर उत्पादन होत आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन २१ टक्क्यांनी वाढले आहे, तर सर्वांत मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात उत्पादन जवळपास २५ टक्क्यांनी खाली आले आहे. तेथे हंगामच उशिरा सुरू झाल्याने उत्पादन कमी झाल्याचे मानले जात आहे.

उत्तर प्रदेशात १०९ साखर कारखान्यांतून ३० नोव्हेंबरपर्यंत ९ लाख ५० हजार टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी तेथे १०८ कारखान्यांतून १० लाख ३१ हजार टन उत्पादन झाले होते. भारतात एकूणच गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन अतिशय संथ गतीने होत आहे. काही ठिकाणी हंगाम जवळपास १५ दिवस उशिरा सुरू झाला आहे. कर्नाटकमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत ६३ कारखान्यांतून ७ लाख ९३ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी ६२ कारखान्यांतून तेथे ७ लाख २ हजार टन उत्पादन झाले होते. तर, गुजरातमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत १७ कारखान्यांतून १ लाख ७८ हजार टन साखर उत्पादन झाले आहे.

‘इस्मा’च्या आकडेवारीनुसार देशात पहिल्या दोन महिन्यांत ३९ लाख ७० हजार टन साखर उत्पादन झाले आहे. जे गल्या वर्षीच्या तुलनेत दीड टक्क्याने जास्त आहे. साखरेचा जगातील सर्वांत मोठा ग्राहक असलेल्या भारतात २६० लाख टन साखरेची मागणी आहे. त्यामुळे भारतातील साखर उद्योगाला मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात करण्याशिवाय पर्याय नाही आणि चीनचा पर्याय त्यासाठी अतिशय योग्य ठरणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here