नवी दिल्ली : प्रचंड उष्णतेच्या लाटेशी सामना करीत असलेल्या देशभरातील अनेक राज्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उत्तर -पश्चिमी भागात वातावरण बदलाचे संकेत दिले आहेत. पुढील तीन दिवसांत या भागात पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर उकाड्याने वैतागलेल्या दिल्लीला आज पावसाने मोठा दिलासा मिळाला. दिल्लीत सोमवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात खूप बदल दिसून आला. दिल्ली एनसीआरसह परिसरात सकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला.
याबाबत टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले की २३ व २४ मे रोजी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशसह उत्तर -पश्चिम भारताला उकाड्यापासून दिलासा मिळेल. पुढील दोन दिवसांत दिल्ली – एनसीआरमध्ये जोरदार पाऊस कोसळेल. वातावरण ढगाळ राहील. स्कायमेट वेदरने सांगितले की, पश्चिम बंगाल, सिक्किम, मिझोराम, त्रिपुरा, केरळच्या काही भागासह अंदमान आणि निकोबार द्विप समुहाच्या उत्तर भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले की, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागात मध्यम पाऊस कोसळू शकतो. स्कायमेट वेदरनुसार कोकण आणि गोवा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, सायलसीमा, तामीळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पावसाची शक्यता दिसून येत आहे.