पानीपत : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी रविवारी पानीपतचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी पानीपतमधील डाहर गावात राज्यातील सर्वात आधुनिक साखर कारखान्याचे उद्घाटन केले. हा कारखाना आता जुन्या कारखान्याच्या तुलनेत तीन पट अधिक गाळप करणार आहे. दी पानीपत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सुशील सारवान यांनी सांगितले की, नवा साखर कारखाना ७३ एकर जागेत उभारण्यात आला आहे. जुन्या कारखान्याचे क्षेत्र ७० एकर होते. नव्या कारखान्याच्या उभारणीस जीएसटीसह ३५६ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हाधिकारी सुशील सरवान यांनी सांगितले की, पानीपत साखर कारखान्याला गेल्या काही वर्षात ऊस विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर चारवेळा द्वितीय क्रमांक मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमावेळी येथे वृक्षारोपण केले. कार्यक्रमाला सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल, खासदार संजय भाटिया, पानीपत ग्रामीणचे आमदार महिपाल ढांडा, पानीपत शहरचे आमदार प्रमोद विज, शुगर फेडचे अध्यक्ष तथा शाहबादचे आमदार रामकरण, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टीवीएसएन प्रसाद उपस्थित होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक नवदीप सिंह यांनी सांगितले की, शनिवारी रात्री कार्यक्रमाची तयारी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या हस्ते बटण दाबून गाळप सुरू करण्यात आले. साखर कारखाना २८ मेगावॅट विजेचे उत्पादन करेल. त्यासाठी टर्बाइन बसवले आहे. सात मेगावॅट वीज प्लांटमध्ये वापरली जाईल. २१ मेगावॅट वीज एचव्हीपीएनएलला दिली जाणार आहे.