राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा प्रकोप सुरू आहे. दिल्लीत मंगळवारी थंडीच्या लाटेत २.४ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. राजधानीत सोमवारी किमान तापमान १.४ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. एक जानेवारी २०२१ नंतर या महिन्यात सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झाली आहे. अधिकृत सुत्रांनी सांगितले की, दाट धुक्यामुळे रस्ते तसेच रेल्वे वाहतुकही विस्कळीत झाली आहे.
मनीकट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर रेल्वेच्या एका अधिकृत सूत्राने पिटीआयला सांगितले की दाट धुक्यामुळे कमीत कमी १५ रेल्वे गाड्या १ ते ८ तास उशिरा चालत आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृष्यमानता ५०० मीटर नोंदविली गेली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दृष्यमानता ० ते ५० मीटरच्या आत असल्यास ‘अटी दाट धुके’, ५१ ते २०० मीटरच्या आत ‘ दाट धुके’ आणि ५०१ ते १००० मीटर च्या आत असल्यास ‘विरळ धुके’ मानले जाते. त्यामुळे विमान वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला असल्याचे दिसून येते. आणखी काही दिवस अशीच स्थिती राहील असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.