दिल्लीसह पूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेने लोकांना हैराण केले आहे. आधी आलेल्या थंडीच्या लाटेपासून आता थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, पुढील काळात पुन्हा एकदा लोकांना याचा सामना करावा लागू शकतो. हवामान विभागाने पुन्हा एकदा थंडीच्या लाटेचा अलर्ट जारी केला आहे. १५ आणि १६ जानेवारी या काळात थंडी आणखी वाढू शकते. पंजाब, हरियाणा, चंदीगढ, दिल्ली आणि राजस्थानच्या काही भागात थंडीच्या लाटेचा तडाखा जाणवू शकतो. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडी नव्हे तर धुक्यामुळे लोकांसमोरील अडचणी वाढू शकतात. याशिवाय, पश्चिम बंगाल, आसम, मेघालय आणि त्रिपुरामध्येही दाट धुक्याचा पट्टा असेल. दिल्लीतील हवेची सद्यस्थितीही खूप खराब असल्याचे दिसून येत आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, दिल्ली एनसीआरमध्ये पुन्हा हवामान बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे यलो अलर्ट आधीच जारी करण्यात आला आहे. रविवारी पुन्हा कोल्ड वेव्हमुळे थंडी वाढू शकते. आगामी काळात जम्मू आणि काश्मीरच्या काही भागात पावसाचीही शक्यता आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीचा परिणाम मैदानी भागात दिसू शकेल. उत्तर भारतातील मोठ्या भागात किमान तापमानात घसरण दिसून येईल. १४ ते १९ जानेवारी या काळात कडाक्याची थंडी पडू शकते.