इंधन दर कपातीनंतर सातत्याने दिलासा, पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर

नवी दिल्ली : देशभरात इंधन दरात सातत्याने दिलासा मिळत आहे. गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या दर कपातीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. बुधवारी, १० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा पेट्रोलियम वितरण कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. सलग सहाव्या दिवशी इंधन दरात बदल झालेले नाहीत. २४ सप्टेंबरपासून सुरू झालेली दरवाढ नोव्हेंबरच्या पहिल्या दोन दिवसांपर्यंत सुरू राहीली होती. या काळात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ८ रुपयांनी महागले होते. मात्र, दिवाळीच्या पूर्वसंध्येला, ३ नोव्हेंबर रोजी इंधनावरील अबकारी कर कमी केल्यानंतर दर स्थिर राहिले आहेत.

कपातीनंतर दिल्लीत पेट्रोल ११० रुपयांवरून १०३ रुपयांवर आले आहे. दिल्लीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने दिल्ली सरकारने व्हॅट कमी करण्याची मागणी केली आहे. अशाच प्रकारे इतर शहरांतही मागणी होत आहे. दिल्लीत आज पेट्रोल १०३.९७ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रती लिटरवर आले आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रती लिटरवर आहे. तर चेन्नईत पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किमतीच्या आधारावर आणि परकीय चलनावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज बदल केले जातात. पेट्रोलियम कंपन्या दरांचा आढावा घेऊन पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या इंधन कंपन्यांकडून दररोज सकाळी विविध शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले जातात.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट केले जातात. फक्त एक एसएमएस करून हे दर आपण जाणून घेऊ शकतो. त्यासाठी इंडियन ऑईलच्या ग्राहकांना (आयओसीएल) RSP हा कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगवेगळा असतो. त्याची माहिती तुम्हाला आयओसीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here