कोरोना: गेल्या २४ तासात नवे ३,४८,४२१ रुग्ण, उच्चांकी ४२०५ जणांचा मृत्यू

71

नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येने पुन्हा गती घेतली आहे. गेल्या २४ तासात ३,४८,४२१ नवे रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, काल हा आकडा ३,२९,९४२ होता. दरम्यान मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४२०५ जणांचा मृत्यू झाला. काल हा आकडा ३८७६ इतका होता. आजवरची ही सर्वोच्च मृत्यूसंख्या आहे.

यामध्ये सर्वाधिक ७९३ मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये ४८० जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक संक्रमित ४०,९४६ रुग्ण महाराष्ट्रात असून त्या पाठोपाठ कर्नाटकमध्ये ३९,५१०, केरळमद्ये ३७,२९०, तामिळनाडूमध्ये २९,२७२ आणि उत्तर प्रदेशमध्ये २०,४४५ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये या राज्यांचा ४८.०६ टक्के हिस्सा आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे २,५४,१९७ जणांचा बळी गेला असून सक्रिय रुग्णसंख्या ३७,०४,०९९ आहे.

गावांमध्ये स्थिती बिकट
दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या ग्रामीण भागात कोरोना संक्रमण आणि मृत्यूंमुळे दहशतीची स्थिती आहे. हरियाणा, पंजाब, उत्तराखंडमधील गावांमध्ये कोरोना संक्रमण आहे. मात्र, तपासण्या आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे किती लोक संक्रमित आहेत, किती लोकांचा मृत्यू झाला याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. गावांमध्ये ताप, खोकल्याने नागरिक त्रस्त आहेत. ही लक्षणे कोरोनाशी संबंधीत असली तरी आरोग्याबाबत बेपर्वाई, कोरोनाची भीती यामुळे लोक लवकर दवाखान्यांमध्ये जात नाहीत. त्यामुळे स्थिती बिघडू लागली आहे.

निर्बंध कडक

कोरोना संक्रमण वाढल्याने २६ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये निर्बंध लागू आहेत. तामीळनाडू, केरळ, कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन आहे. तर गुजरात, तेलंगणा, आसाम आणि हिमाचल प्रदेशमध्ये कडक निर्बंध आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here