कोरोना मृत्यूंच्या संख्येमुळे दहशत: देशात एका दिवसात ४३२९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव सुरूच आहे. एकीकडे देशात नव्या रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना मृतांच्या संख्येमुळे दहशत निर्माण झाली आहे. मंगळवारी, पहिल्यांदाच ४३२९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर गेल्या २४ तासात २ लाख ६३ हजार ५३३ नवे रुग्ण आढळले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांहून कमी रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत २,६३,५३३ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या २,५२,२८,९९६ वर पोहोचली आहे. गेल्या २८ दिवसांत नवी रुग्णसंख्या पहिल्यांदाच कमी आहे. यापूर्वी २० एप्रिल रोजी दिवसातील रुग्णसंख्या २,५९,१७० इतकी होती.
दरम्यान, देशात पहिल्यांदाच ४३२९ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. एका दिवसात मृत्यूमुखी पडलेल्यांची ही आजवरची सर्वोच्च संख्या आहे. यापूर्वी ७ मे रोजी ४२३३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. यासोबतच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २७८७१९ वर पोहोचली आहे. देशात गेल्या आठवड्यापासून दररोज ४००० जणांचा मृत्यू होत आहे.

दिवसभरात ४.२२ लाख रुग्ण झाले बरे
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णसंख्याही खालावू लागली आहे. गेल्या २४ तासांत उच्चांकी ४,२२,४३६ जण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. यासोबतच २,१५,९६,५१२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६० टक्के इतके आहे. नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या दोन महिन्यानंतर दुप्पट झाली आहे. सध्या देशात ३३,५३,७६५ सक्रिय रुग्ण आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ३१,८२,९२,८८१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सोमवारी १८,६९,२२३ नमुने तपासण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here