कोरोनाचे दिवसभरात उच्चांकी 3.6 लाख नवे रुग्ण, ३२९३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची दुसरी लाट अधिक वेगाने पसरत आहे. गेल्या २४ तासात देशभरात ३,६०,९६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १,७९,९७,२६७ झाली आहे. तर देशात सध्या २९.७८,७०९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील १,४८,१७,३७१ जण कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे गेल्या २४ तासात ३२९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोना महामारीमुळे एकूण २,०१,१८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने लसीकरणावर भर दिला असून आतापर्यंत एकूण १४.७८,२७,३६७ जणांना लस देण्यात आली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) म्हणण्यानुसार २६ एप्रिलअखेर देशभरात २८,२७,०३,७८९ चाचण्या घेण्यात आल्या. तर फक्त २६ एप्रिल रोजी १७,२३,९१२ चाचण्या झाल्या.

महाराष्ट्रात स्थिती गंभीर
महाराष्ट्रात मंगळवारी, गेल्या २४ तासांत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोना संक्रमणामुळे राज्यात ८९५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यासोबतच कोरोनामुळे महाराष्ट्रात एकूण ६६,१७९ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मंगळवारी कोरोना व्हायरसचे नवे ६६,१७९ रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच एकूण संक्रमितांची संख्या ४४,१०,०८५ झाली आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत ६,७३,००० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३६,६९,५४८ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here