देशात आजपासून १५-१८ वयोगटासाठी कोरोना लसीकरणाची मोहीम

नवी दिल्ली : देशात गतीने वाढणारे कोरोना संक्रमण आणि ऑम्रिकॉन व्हेरियंट रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न वाढवले आहेत. आज, सोमवारपासून देशातील १५ ते १८ या वयोगटातील मुलांना कोरोना लसीचा डोस देण्यात येत आहे. यासाठी कोविड प्लॅटफॉर्मवर रविवारी रात्रीपर्यंत ६ लाख मुलांनी नोंदणी केली होती. ही आकडेवारी आता ८ लाखांवर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांतील १५-१८ वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी स्वतंत्र केंद्रे सुरू करावीत, याशिवाय, स्वतंत्र रांगा, लसीकरण पथके उपलब्ध करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री, मुख्य सचिव, राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांचे अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा केली. लसीकरणाचे सर्व निर्देश पालन करावेत यावर त्यांनी भर दिला. लाभार्थ्यांना डोस मिळावेत यासाठी केंद्रांवर सुसज्ज व्यवस्था ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले.

या लसीकरणासाठी COWIN या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपवब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय मोबाईलवरुनही नोंदणी केली जाऊ शकते. या वयोगटातील मुले स्वतः नोंदणी करू शकतात. रविवारपर्यंत ६.३५ लाखाहून अधिक जणांनी नोंदणी केली होती. सकाळी ही संख्या ८ लाखापर्यंत पोहोचली. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने १२ वर्षावरील मुलांच्या लसीकरणाला काही अटींवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here