कोरोना व्हायरस : देशात स्थिती नियंत्रणाबाहेर, २४ तासांत २ लाख नवे रुग्ण, १०८३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीची दुसरी लाट अतिशय घातक असल्याचे दिसून येत आहे. संक्रमितांची संख्या वाढण्याबरोबरच मृत्यूही वाढले आहेत. देशात आज एकाच दिवसात सर्वाधिक दोन लाख रुग्ण आढळले. गेल्या दहा दिवसांत ही संख्या दुप्पट झाली आहे. अमेरिकेत रुग्णसंख्या एक लाखावरून दोन लाखावर पोहोचण्यासाठी २१ दिवस लागले होते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ़, कर्नाटक आणि केरळसह १६ राज्यांमध्ये संक्रमण गतीने वाढले आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात २ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले. या दरम्यान, १०८३ जणांचा मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या १,७३,१२३ झाली आहे. गेल्यावर्षी १८ ऑक्टोबरनंतर, पहिल्यांदाच एकाच दिवशी एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूदरात सातत्याने घट येत असून तो आता १.२४ टक्क्यांवर आला आहे. देशात संक्रमितांची संख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार झाली आहे. यापैकी १ कोटी २४ लाख २९ हजार जण पूर्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८८.९२ इतकी आहे.

दहा राज्यांत ८२ टक्के नवे रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार दहा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशात स्थिती गंभीर आहे. दिवसभरात नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी ८२.०४ टक्के रुग्ण या राज्यांतीलच आहेत. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ़, कर्नाटक आणि केरळचा समावेश आहे. या राज्यांसह एकूण १६ राज्यांत संक्रमण वाढले आहे.

१३ लाखांहून अधिक चाचण्या
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात बुधवारी १३ लाख ८४ हजार ५४९ चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत २६ कोटी २० लाख ३ हजार चाचण्या झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here