जोरदार पावसाने महाराष्ट्रात ८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुंबई : महाराष्ट्रात या वर्षीच्या मान्सूनमध्ये जोरदार पावसाने जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आठ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पिकांचे नुकसान ठिकठिकाणी झाले आहे आणि ते काही जिल्ह्यांपुरते मर्यादीत आहे. मात्र, सातत्याने पाऊस सुरू राहिल्यास यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात सात दिवस सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या सात दिवसांपासून पावसाने थोडा दिलासा दिल्यानंतर कोकणात हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. मुंबई, ठाणे, पालघरसाठीही पूर्वानुमान वर्तविण्यात आले आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, कृषी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही जिल्हे आणि तालुक्यांमध्ये पूर आले आहे. त्यात शेती क्षेत्र पूर्णपणे बरबाद झाले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी भूस्खलनाची शक्यता आहे. यावर्षी खरिपात १५२ लाख हेक्टरमध्ये पेरण्या होण्याची शक्यता होती. जूनमध्ये मान्सून येऊनही चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे बराच काळ पेरण्या झाल्या नाहीत. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, या पाठोपाठ आलेल्या पुराने पिकांचे नुकसान झाले. विदर्भात सोयाबीन, कापूस शेतीतील भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले. तर मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, लातूर आणि बिड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here