क्रूड ऑईल ९३ डॉलरवर, महागाई भडकण्याची शक्यता

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑईलचा दर (Crude Oil) ९३ डॉलर प्रती बॅरल झाला आहे. गेल्या सात वर्षात क्रूड ऑईल सर्वोच्च स्तरावर आहे. मागणीच्या पातळीवर कमी जागतिक पुरवठा, रशिया आणि पश्चिम देशातील वाढत्या तणाव, अमेरिकेतील खराब हवामान या कारणांमुळे क्रूडचे दर सातत्याने वाढत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वाढती मागणी पाहता हे दर लवकरच १०० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचू शकतात. फक्त यावर्षी याचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत. ही दरवाढ अशीच सुरू राहीली तर याचे परिणाम काय होतील याची चर्चा सुरू झाली आहे.

महागड्या क्रूड ऑइल मुळे पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात. तुमचा इंधनाचा खर्च वाढेल. सरकारने गेल्या ६९ दिवसांपासून दर जैसे थे ठेवले आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमुळे पेट्रोलियम कंपन्यांनी दर स्थिर ठेवल्याची चर्चा आहे. दहा मार्च रोजी निकाल जाहीर होतील, त्यानंतर दरवाढीची शक्यता आहे. दरवाढ झाल्यास महागाई भडकण्याची शक्यता आहे. डिझेलमुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ होते. त्यामुळे फळे, भाजीपाल्यासह इतर वस्तूंच्या दरात वाढ होईल. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयावर दबाव वाढेल. सोमवारी रुपया ७४.७३ प्रती डॉलर अशा स्तरावर होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत तो २ रुपयांनी कमजोर आहे. केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर कपात केली होती. जर कर कपात झाली नसती, तर हे दर १२५ रुपयांवर पोहोचले असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here