धामपूर : धामपूर साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात क्षमतेपेक्षा अधिक ऊस गाळप करत उच्चांक प्रस्थापित केला आहे. २७ फेब्रुवारी रोजी कारखान्याने पुन्हा एकदा आपला विक्रम मोडला. कारखान्याच्या ऊस विभागाचे सरव्यवस्थापक ओमवीर सिंह यांनी सांगीतले की, कारखान्याने २४ तासात १.४० लाख क्विंटल गाळप करण्याची क्षमता आहे. मात्र, गेल्या २४ तासात कारखान्याने १.४५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाच्या सरव्यवस्थापकांनी सांगितले की, कारखान्याच्या गळीत हंगामाला २९ ऑक्टोबर रोजी प्रारंभ झाला. २७ फेब्रुवारीपर्यंत १२२ दिवसात एक कोटी ५३ लाख २० हजार क्विंटल उसाचे गाळप करुन १० लाख ३२ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्या वर्षी १२२ दिवसात एक कोटी ३८ लाख ३३ हजार क्विंटल उसाचे गाळप झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ लाख क्विंटलने गाळप वाढले आहे. कारखान्याने आतापर्यंत दोनदा स्वतःचा उच्चांक मोडला आहे. २२ नोव्हेंबर रोजी कारखान्याने गाळप क्षमतेच्या तुलनेत अधिक, १ लाख ४१ हजार ६०० क्विंटल गाळप केले. त्यानंतर १३ जानेवारी रोजी १ लाख ४२ हजार १०० क्विंटल उस गाळप झाले आणि आता २७ फेब्रुवारी रोजी दोनदा उच्चांकी गाळप झाले आहे. हा शेतकऱ्यांसाठी गौरवास्पद क्षण आहे.