चंडीगढ : हरियाणामध्ये चालू आर्थिक वर्षात जवळपास ५०० लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती सहकार मंत्री बनवारी लाल यांनी दिली. मंत्र्यांनी सहकार महासंघाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून सांगितले की, राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे गाळप नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. यासाठीची सर्व तयारी सुरू असून ती ऑक्टोबरच्या अखेरीस पूर्ण होईल. राज्यातील सर्व कारखान्यांनी वेळेवर ऊस बिले द्यावीत अशी सूचना मंत्र्यांनी केली.
लेटस्टाइलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहकार विभागाच्या एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे की, या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव टीव्हीएसएन प्रसाद, हरियाणा डेअरी विकास सहकारी संघ आणि हॅफेडचे व्यवस्थापकीय संचालक ए. श्रीनिवास, हरियाणा राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सहकारी प्राथमिक कृषी समित्यांच्या माध्यमातून सुक्ष्म सिंचन योजनांची सुरुवात करण्यात यावी, अधिकाऱ्यांनी कालबद्धपणे कारखान्यांच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करावे अशी सूचना मंत्र्यांनी केली. कारखान्यांकडून इथेनॉल युनिट, गूळ, कँडी आदी उप उत्पादनांकडे लक्ष दिले जावे असे ते म्हणाले.