राज्यातील गाळप हंगाम १० नोव्हेंबरनंतर !

पुणे : राज्यात ४५० हून अधिक महसूल मंडळांमध्ये १ जूनपासून खूपच कमी पाऊस झाला आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ५१ हजार हेक्टरवरील ऊस कमी झाला असून पावसामुळे आगामी गाळप हंगाम १ ऑक्टोबरऐवजी १० नोव्हेंबरनंतर सुरू होणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दैनिक ‘सकाळ’ला दिली. मंत्र्यांची उपसमिती त्यावर अंतिम निर्णय घेईल, असेही सूत्रांनी सांगितले.

पावसाने अशीच ओढ दिल्यास उपलब्ध उसाच्या क्षेत्रात पुन्हा घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात काही कारखाने उसाचा अंदाज घेऊन सुरू होणार नाहीत, असाही अंदाज आहे. एकूणच पावसाअभावी यंदाचा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अडचणीचा असणार आहे. पण, यंदा उसाच्या क्षेत्रात घट झाल्याने या गाळप हंगामात अंदाजे १२ लाख मेट्रिक टन साखरेची घट होईल, असा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे.

दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, मागील वर्षी राज्यातील २११ साखर कारखान्यांनी १४ लाख ८८ हजार हेक्टरवरील उसाचे गाळप केले होते. यंदा मात्र परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा अपवाद वगळता राज्यात ऊस पिकाला पोषक पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला असून त्याचा उत्पादनावर थेट परिणाम होणार आहे. काही जिल्ह्यात शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊस विक्री करत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आगामी हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाने चालवणे ज्जीक्रीचे होणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. पण, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी धरण अजूनही १८ टक्क्यांवरच आहे. पुण्यासह इतर जिल्ह्यांमधील धरणाची अशीच अवस्था आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सव्वादोन लाख हेक्टर शेतीला उजनीचा आधार आहे. उजनीतील पाण्याच्या भरवशावर अनेक शेतक-यांनी उसाची लागवड केली आहे. परंतु, यंदाचा पावसाळा महिनाभर राहिलेला असतानाही उजनीत अपेक्षित पाणी आलेले नाही. धरण 33 टक्के भरल्याशिवाय शेतीला पाणी सोडता येत नाही, असा २००१ चा शासन निर्णय आहे. त्याचाही परिणाम उसाचे क्षेत्र कमी होण्यावर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here