हवाना : क्युबातील साखर उद्योग सध्या खूप संकटातून जात आहे. कधीकाळी साखर निर्यातीत जगात अग्रस्थानी असलेला हा देश सध्या आयातीवर अवलंबून आहे. देशातील ऊस पिकाचे क्षेत्र सातत्याने घट असून त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर दिसून आला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार क्युबामध्ये २०२०-२१ या हंगामात ८,००,००० टन साखर उत्पादन झाले. हे उत्पादन तीन दशकांपूर्वीच्या सर्वोच्च उत्पादनाच्या केवळ १० टक्के आहे. आणि ही या उद्योगातील गेल्या १३० वर्षातील सर्वात खराब स्थिती आहे.
क्युबा हा १९८९ पर्यंत जगातील सर्वात मोठा निर्यातदार होता. तर १९६० पर्यंत अमेरिका हा याचा प्रमुख ग्राहक होता. त्यानंतर सोविएत संघ हा महत्त्वाचा खरेदीदार बनला. १९९१ मध्ये कम्युनिष्टांच्या पतनानंतर क्युबातील साखर उद्योगाला मोठा झटका बसला. पाश्चिमात्य देशांनी लादलेले निर्बंध, किमतीमधील घसरण आणि गुंतवणुकीत आलेली घट यामुळे पाहता पाहता १०० कारखाने बंद पडले. सध्या केवळ ५६ कारखाने सुरू आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये सरकारने साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी डझनभर उपाययोजनांना मंजुरी दिली. यात ऊस उत्पादकांना दिला जाणारा दर दुप्पट करण्यात आला. कामगारांची मोफत भरती आणि कारखान्यांना निर्णय घेण्याची स्वायत्तता देण्यात आली. सरकारच्या उपायांमुळे साखर कामगारांच्या पलायनाची गती संथ झाली आहे. मात्र, आजही क्युबातील साखर उत्पादक खते आणि किटकनाशकांच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत.