तांदूळ निर्यातीवर बंदी: चीनमध्ये वाढले अन्न संकट

219
नवी दिल्ली : भारताने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर तत्काळ प्रभावाने बंदी घातल्याने चीनमध्ये अन्न पुरवठ्याची साखळी विस्कळीत होताना दिसत आहे. कारण, चीन हा भारतीय तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार मानला जातो. बंदी आदेशानुसार, भारताने पांढऱ्या आणि तपकिरी तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावले आहे. भारताने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली असली तरी उकडा तांदूळ आणि बासमती तांदळाचा समावेश निर्बंधांच्या यादीत केलेला नाही.
भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार आहे, जागतिक तांदूळ व्यापारात देशाचा हिस्सा ४० टक्के आहे. भारत जगभरातील १५० हून अधिक देशांना तांदूळ निर्यात करतो. जर याच्या शिपमेंटमध्ये कपात झाली, तर अन्नधान्याच्या किमतींवरील दबाव वाढेल. अहवालानुसार, सद्यस्थितीत अनेक देश वाढत्या अन्न संकट, महागाईशी झुंज देत आहेत. भारताच्या या निर्णयाचा परिणाम या देशांवर होईल. भारत काही आफ्रिकन देशांसाठीही तुकडा तांदळाचा मोठा पुरवठादार आहे.
चीन कृषी सूचना नेटवर्कद्वारे प्रकाशित लेखानुसार, चीन भारतीय तुकडा तांदळाचा मोठा खरेदीदार आहे. त्यांनी २०२१ मध्ये भारताकडून १.१ मिलियन टन तुकडा तांदळाची आयात केली. २०२१ मध्ये भारताची एकूण तांदूळ निर्यात उच्चांकी २१.५ मिलियन टनापर्यंत पोहोचली. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही निर्यात अधिक आहे. अहवालात म्हटले आहे की, चीनमध्ये तुकडा तांदळाचा वापर मुख्यत्वे जनावरांचे खाद्य, नुडल्स आणि वाईन उत्पादनासाठी केला जातो.
तांदळावर भारताने निर्यात बंदी घातल्याने जगभरात तांदळाच्या किमती वाढू शकतात. त्यातून अन्नधान्याची महागाई आणखी वाढेल. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक अन्न बाजारपेठेत अराजकतेची शक्यता आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गहू आणि मक्का यांच्या किमतीत वाढ झाली. मात्र या तुलनेत तांदूळ हा असा एकमेव पदार्थ राहिला की त्याच्या पुरेशा साठ्यामुळे मोठ्या अन्न संकटापासून बचाव झाला आहे. आता भारताच्या या नव्या निर्णयाने ही स्थिती बदलू शकते.
गेल्या आर्थिक वर्षापासून मार्चपर्यंत, भारताने जागतिक स्तरावर ३.८ मिलियन टन तुकडा तांदूळ निर्यात केला. बिगर बासमती तांदूळ निर्यातीचा हा जवळपास पाचवा भाग आहे. एप्रिल ते जूनपर्यंत स्वस्त वस्तूंची निर्यात १.४ मिलियन टन अथवा बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीच्या जवळपास एक तृतीयांश भाग होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here